सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली आहे.
मंगळवारी रात्री स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मार्केटला जाणारा पिकअप टेम्पो मधील नवे जुने आले एकत्र करत रस्त्यावर ओतून दिले. या वेळेला आंदोलकांनी टेम्पोच्या काचा फोडून वाहनाची हवा सोडून देण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ठीकठिकाणी आंदोलन करत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आक्रमक झाल्याने प्रतवारी विरोधातला आंदोलन आता पेट घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी आल्याच्या प्रश्न गंभीर बनला असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने रस्त्यावर आले ओतून आंदोलन करण्यात आले. तसेच आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आले वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील अडवून धरल्या.