सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जनम्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने वाई आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला. मात्र, अजुनही सवलती लागू होत नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेरकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्ह्यातील अनेक विभागांत गेल्यावर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने फक्त दुष्काळ जाहीर करुन बोळवण केली. परंतु, कोणत्याही दुष्काळी सवलतीचा लाभ अथवा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यासाठी सवलती तत्काळ लागू कराव्यात. त्याचबरोबर पाऊस कमी पडल्याने शेतीतून योग्य उत्पादन मिळाले नाही. चार प्रमुख पिके जिल्ह्यात होतात. यामधील कोणत्याही पिकाला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे योग्य दरच मिळालेला नाही.
दुधालाही भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा कारणाने संपूर्ण बाजारपेठ शांत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील अर्थचक्र थांबलेले आहे. राज्य शासनाने दुष्काळाची घोषणा केली. पण, आजपर्यंत कोणताही लाभ दिला नाही. यासाठी चार दिवसांत आढावा घेऊन सवलती लागू करण्याची गरज असल्याचे निवेदनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी म्हंटले आहे.