कराड प्रतिनिधी । सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी काल एकीकडे उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. या गडबडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके यांनी निवास थोरातांसह नऊ जणांच्या याचिकेला आव्हान देणारी रिट पिटिशन याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर मुंबईत सुनावणी पार पडली. यावेळी निवास थोरात उपस्थित नसल्यामुळे न्यायालयाने मंगळवार, दि. २५ मार्च रोजी, पुढील सुनावणी ठेवली.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दि. ५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला होता. त्यावर थोरात यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केले होते. त्यात तो अर्ज पुन्हा वैद्य ठरवला गेला होता. मात्र, निवास थोरात यांच्या या निकालाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर शुक्रवार, दि. २१ रोजी दुपारी सुनावणी पार पडली.
महत्वाच्या असलेल्या या सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस काँग्रेसचे निवास थोरात यांच्यासह संबंधितांना न्यायालयाने पाठवली होती. मात्र, त्या सुनावणीस थोरात यानी गैरहजेरी लावली. त्यामुळे न्यायालयाने मंगळवार, दि. २५ मार्च रोजी, पुढील सुनावणी ठेवण्याचा निर्णय घेतला.
अपिलामध्ये साखर सहसंचालकांनी तो अर्ज कसा काय वैध केला? : राजू शेळके
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. ती हरकत बरोबर असल्यानेच छाननीत हा अर्ज अवैध ठरला होता. मात्र अपिलामध्ये साखर सहसंचालकांनी तो अर्ज कसा काय वैध केला?, हे नेमके समजले नाही. पण हा निकाल आम्हाला मंजूर नसल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र निवास थोरात न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना मंगळवार, दि. २५ तारीख दिली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.