सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्यातील आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. मोदींचे गुरुवर्य इनामदार यांचे मूळ गाव खटाव असून त्यांच्या तालुक्यातून आणि गावातून वाहणारी येरळामाई नदी देखील प्रवाहीत करावी. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी खटाला येण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी घातले असल्याची माहिती ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
अनिल पवार पुढे म्हणाले की, खkटाव तालुक्यातील येरळा नदीचाही जिहे-कटापुर योजनेत समावेश आहे. या योजनेतून येरळामाई नदीवरील 15 बंधारे या योजनेतून भरण्याची तरतूद आहे. या योजनेतून खटाव तालुक्यातील जवळपास 11700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यंदा खटाव मध्येही दुष्काळ पडला आहे. उरमोडी चे आवर्तन 1 महिना उशिरा सुटले आहे. त्यामुळे पिके तर वाया गेली आहेत. मात्र अशीच परिस्थिती राहिली तर खटावकर जनतेला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जनावरांना ओला चारा मिळणार नसल्याने पशुधन अडचणीत येणार आहे. त्यामुळे येरळामाई प्रवाहित करून खटाववासियांचा आनंद द्विगुणित करावा.
नरेंद्र मोदी यांना खटावला येण्याचे निमंत्रण याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले आहे. हा ई मेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सध्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.
जिहे-कटापुर योजनेद्वारे कृष्णामाईमुळे माणगंगा आणि येरळामाई प्रवाहित होऊन दुषकाळ मुक्ती होईल, असे स्वप्न खटाव, माणमधील जनता 1995 पासून उराशी बाळगून आहे. माणगंगा नदीचे निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण प्रवाहित करून जलपूजन केले जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र तो क्षण मानगंगेबरोबरच खटावची वरदायिनी असलेल्या येरळामाईच्या वाट्याला यायला पाहिजे होता, मात्र दुर्दैवाने असे घडत नसल्याने खटाव वासियांना प्रचंड वाईट वाटत आहे. खटाव वासियांना आनंदात सहभागी करून घेता येत नसले तरी निदान या उपसा सिंचन योजनेसाठी पहिल्या दिवसापासून ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांचे तरी स्मरण करण्याची सुबुद्धी या निमित्ताने लोक प्रतिनिधींना मिळावी, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली आहे.