सातारा प्रतिनिधी । केंद्रात खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी भाजपा श्रेष्ठींकडे केली आहे.
सुवर्णा पाटील यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार, अल्पसंख्याकांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण केला गेलेला संभ्रम, शेतकऱ्यांमधील नाराजी, याचा फटका निवडणुकीत भाजपा व महायुतीला बसला आहे. तरी देखील मोदी लाटेत राष्ट्रवादीकडे असलेला सातारा मतदार संघ आम्ही भाजपने खेचून आणला आहे. त्यामध्ये सातारा मतदार संघाचा सिंहाचा वाटा आहे. सातारचे राजघराणे हे शिवप्रभूचा वारसा सांगणारे असून समाजाच्या सर्व घटकात व स्तरात त्यांचाबद्दल आत्मीयता आहे. विकासात्मक वृत्तीने कै. दादामहाराज, श्री. छ. उदयनराजे, श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ती जपली.
शेतकरी, दलित बांधव, अल्पसंख्याक व मराठा, या सर्व समाजाला सोबत आणण्याची, त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याची क्षमता सातारच्या राजघराण्यात आहे. मात्र काही अनाकलनीय कारणामुळे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ या राजघराण्याला मंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी केंद्रीय मंत्रिमंडळात श्री. छ. उदयनराजे भोसले यांना व राज्याच्या मंत्रिमंडळात श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी सुवर्णा पाटील यांनी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने भाजप श्रेष्ठींकडे केली आहे.