सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, चार वर्षांच्या चिमुरड्याच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या आहेत.
शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सदाशिव दादा गाढवे (रा. महाबळेश्वरवाडी) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली आहे. आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडीच्या हद्दीतील गाढवेवस्ती ते महाबळेश्वरवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पाझर तलावाजवळ रस्त्याच्या बाजूने श्रीपत गाढवे हे मेंढ्या चारून घरी येत होते. तलावाजवळ त्यांना शिवतेज हा पडलेला दिसून आला. त्याच्या शरीरावर जखमा झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.