सातारा प्रतिनिधी । सध्या किरकोळ कारणावरून जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत. अशात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी (नांदगिरी) येथील एकाने आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन जळगाव येथील एका युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. कारच्या धडकेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव जळगाव रस्त्यावर पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता कारचालकाच्या विरोधात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल चंद्रकांत शिंदे (धुमाळवाडी-नांदगिरी, ता. कोरेगाव) असे कारचालकाचे नाव असून निलेश जाधव, (रा. जळगाव) असे जखमीचे नाव आहे. निलेश जाधव यांच्या पत्नी पूनम निलेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सुमारास कोरेगाव ते जळगाव रस्त्यावर विशाल चंद्रकांत शिंदे याने निलेश जाधव यांच्यावर नांदगिरीतील आपल्या कुटुंबातील एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण असल्याचा संशय घेतला, त्यानंतर स्वतःच्या ताब्यातील मारुती वॅगनआर कारने निलेश जाधव हे दुचाकीवरून जळगावकडे निघाले असता पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. यामध्ये निलेश जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरेगाव पोलीस ठाण्यात विशाल चंद्रकांत शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने निलेश जाधव यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.