सातारा प्रतिनिधी | सासपडे (ता. सातारा) गावाच्या हद्दीत महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिन्यांच्या चोरीप्रकरणी बोरगाव पोलिसांनी एकास अटक केली. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे देवीचे डोरले जप्त करण्यात आले आहे.
अनिल अशोक धुमाळ (वय 34, मूळ रा. कार्वे ता. कराड सध्या रा. सासपडे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवीच्या डोरले चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. संशयित अनिल धुमाळ हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतो. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मंदिराकडे आला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
त्याचा शोध घेतला असता अनिल हा गणेशखिंड (करंजोशी) गावच्या बसथांब्याजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डी. बी. पथकाच्या पोना प्रशांत चव्हाण, अतुल कणसे, केतन जाधव यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.