कराड प्रतिनिधी । एकीकडे महाविकास आघाडी तुमच्या – आमच्या विकासाचे बोलत आहे. आणि दुसरीकडे महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली. याचा नीट विचार करा. महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत की, त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली. सरकारी योजनेवर हे कशासाठी मिरासदारी करत आहेत. महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
कराड तालुका महाविकास आघाडीच्यावतीने आज भव्य महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, अर्चना अविनाश मोहिते यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी अंधारे म्हणाले की, कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा. कराड दक्षिणेची जनता पृथ्वीराज बाबांच्या रूपाने राज्याचे नेतृत्व निवडत आहे. असे सांगून निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी मुख्यमंत्री एवढे शांत आहेत. पण दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून? असा सवाल करत समोरच्या उमेदवाराला पडायचा लयं नाद असेल, तर त्याचा नाद पुरा करा. तीनवेळा पडले त्यांना चौथ्यांदा पाडा.
महिलांचा अपमान करण्याची परंपरा फडणवीस यांनी घालून दिली. फडणवीस यांची नजर कराडवर पडली आहे. कराडला गिळण्यासाठी त्यांनी एक कळसूत्री बाहुली उभी केली आहे. कराडला त्यांना नासवायचे. ते धार्मिक दंगली व जातीभेद करतील, हेही ओळखा असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले. यावेळी विनयकुमार सोरके, शारदा जाधव, अर्चना मोहिते, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. विद्याताई थोरवडे यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली थोरात यांनी आभार मानले.
डॉ. आंबेडकरांचाही तुम्ही अपमान केला आहे. त्यावर अमित शाहा काय बोलणार?
किरिट सोमय्या यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आता भाजपमध्ये आहेत. आम्हाला आनंद आहे की अमित शाह त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट उध्दव ठाकरे यांच्या नावाने करतात. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठे भक्कम आव्हान हे उध्दव ठाकरेच वाटतात. ही आमच्यासाठी प्रचंड सकारात्ममक आणि लढण्यासाठी उर्जा देणारी बाब असल्याचे अंधारे म्हणाल्या. ठाकरे बाणा हा महाराष्ट्राला माहिती आहे. ते स्क्रिप्ट आणून पोपट पंची करत नाहीत. परंतू आम्हाला जे सावरकरांबद्दल सांगत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की राहुल गांधींच्या हातातले लाल संविधान बघून जे अर्बन नक्षली शब्द वापरला त्याचा अर्थ तुम्ही नुसता संविधानाचा अपमान केला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही तुम्ही अपमान केला आहे. त्यावर अमित शाहा काय बोलणार? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
महायुतीने लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी २० लाख रुपयांचे पोस्टर
प्रत्येक महिलेच्या लग्नाच्या मंडपात व स्वागत कमानीवर तिच्या घरच्यांनी कधी पोस्टर लावले का?, आपल्या भावांनी ते केले नाही. भावाने बहिणीला दहा, पाच हजार दिले म्हणून पोस्टर लावला का?, कारण तेथे त्यांना बहिणीच्या नात्याची मर्यादा कळली होती. बहिणीच्या गरीबीची टिंगल त्यांनी केली नाही. आमचा भाऊ पोस्टर लावत नाही. पण महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी २० लाख रुपयांचे पोस्टर लावले.