सातारा प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना नुकतेच एक महत्वाचे निवेदन दिले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातील गावांचे तात्काळ पुनर्वसन आणि वन्यजीवांचे संरक्षण करावे, अन्यथा 10 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची इशारा मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत असलेली अतिदुर्गम गावे, वाड्यावस्त्यांपैकी गाभा क्षेत्रातील काही गावांचे पुर्नवसन झाले आहे. मात्र, काही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. देऊर, वेळे, ढेण, तळदेव, मायणी, खिरखंडी, मळे, कोळणे, पाथरपुंज, खुंदलापूर (धनगर वस्ती), गोठणे व कुंडी या गावांमध्ये लोक वास्तव्यास आहेत. या लोकांचे जीवन जंगलावर अवलंबून असून, वनौपज गोळा करण्यासाठी, घरांच्या बांधकामांना लाकडे आणण्यासाठी ते घनदाट जंगलात जातात.
यात त्यांच्याकडून वन व पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन आणि जैवविविधतेचे नुकसान होते. काही लोकांवर वन्यप्राणणी हिंस्र हल्ले करतात. त्यामध्ये काहींना जीव गमवावा लागला आहे. ही गावे कोयना अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात असल्याने, तेथे 18 नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. जल, जंगल, जमीन या संसाधानांचे संरक्षण आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करण्यात यावे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी 9 जूनपर्यंत कार्यवाही करावी, अन्यथा 10 जूनपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे.