सातारा प्रतिनिधी | हिरव्यागार वनराईमुळे पश्चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व निसर्ग सौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेल्या कोयना परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलत असून पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या ओझर्डे धबधब्याला लाखो पर्यटक भेट देत असतात. प्रशासनाला लाखो रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र, यामध्ये स्थानिकांना सामावून घेतले जात नाही. नवजा वन समितीकडे धबधब्याचे व्यवस्थापन दिल्यास या स्थानिक लोकांचा आर्थिक-सामाजिक विकास होऊन उत्पन्नात भर पडेल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.
याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सहयाद्री वाचवा मोहीम अंतर्गत अनियंत्रित पर्यटन, योग्य नियोजनाच्या अभावामुळे एकेकाळी सौंदर्यपूर्ण आणि निसर्गसंपन्न असलेली व्याघ्र प्रकल्पातील ही पर्यटनस्थळे आता बकाल होऊ लागली आहेत. परिणामतः याठिकाणी अस्वच्छता, वाढती गर्दी, पर्यटनस्थळांची नासधूस, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
यांत्रिकीकरण व आधुनिकीकरणाच्या वेगात हे प्रमाण जास्तच वाढले आहे. या सगळ्याला वेळीच आवर घालायचा असल्यास स्थानिकांना निसर्ग पर्यटनात सामावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुज्ञ व कमीतकमी वापर आणि स्थानिक लोकांचा आर्थिक-सामाजिक विकास ही निसर्ग पर्यटनाची मुख्य उद्दिष्टे समोर ठेवून निसर्गाची धारणक्षमता ओळखून, स्थानिकांच्या शाश्वत विकासासाठी, पर्यटकांच्या आनंदासाठी निसर्ग पर्यटन राबवणे गरजेचे असून पर्यटक, व्यावसायिक व स्थानिकांची यात महत्त्वाची भूमिका असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले.