सातारा प्रतिनिधी । गोगावलेवाडी ता. सातारा येथील जलसागर ढाब्याच्या अतिक्रमणाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विविध सहा ते सात मागण्यांसाठी मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले.
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद म्हटले आहे की, गोगावलेवाडी तालुका सातारा येथे अरुण कापसे यांनी खानावळ व्यवसायासाठी जलसंपदा विभागाकडून जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. ही जागा मोकळी करण्यासाठी कापसे यांना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. कापसे यांनी अनधिकृत खानावळ व्यवसाय काढण्यात येऊ नये यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे.
जलसंपदा विभागाने वारंवार नोटीस काढूनही कोणतीही कारवाई होत नाही ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निकालानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल, असा खुलासा कण्हेर पाटबंधारे विभागाचे उपविभागी अभियंता अमित तपासे यांनी दिला आहे. लिंब गोवे आरफळ अनगळ या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी तसेच जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक व्यंकटेश गौर यांची बदली झाली आहे. तरी देखील ते अजून साताऱ्यातच कार्यरत आहेत. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, शेंदुरजणे येथील मॅप्रो कंपनीचे अतिक्रमण काढण्यात यावे व ओगलेवाडी येथील रस्ता खुला करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दिवसभर उपोषण आंदोलन केले.