सातारा प्रतिनिधी | पोवईनाका येथील शिवतीर्थाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण पुतळा परिसरात नो- फ्लेक्स झोनच्या ठरावाची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवजयंती दिनी शिवतीर्थावर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
ठराव झाला, पण कारवाई नाही
सातारा नगरपालिकेने ६ जानेवारी २०२३ रोजी नो फ्लेक्स झोनचा ठराव केला आहे. तरीही शिवतीर्थाच्या परिसरात वारंवार बोर्ड लावण्यात येतात. अनेकवेळा बोर्ड काढून नेणे, संबंधितांना नोटीसा काढणे एवढीच कारवाई होते. परंतु, आजपर्यंत कोणावरही दंडात्मक कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही, असे सुशांत मोरे यांनी सांगितले.
चमको कार्यकर्त्यांच्या फ्लेक्सने शिवतीर्थ झाकोळला
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेला शिवतिर्थाचा परिसर प्रेरणा देणारा आहे. परंतु सध्या या परिसराला कायमपणे फ्लेक्स, जाहिरातींनी विळखा घातलेला आहे. वास्तविक जाहिराती संबंधी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने सुचित केले आहे. त्यानुसार नगरपालिकेने शिवतिर्थाचा परिसर नो फ्लेक्स बोर्ड झोन करण्याचा ठराव केला आहे. परंतु, आतापर्यंत कोणावरही दंडात्मक तरतुदीनुसार कारवाई करण्यात आलेली नाही. काही लोकप्रतिनिधींचे ‘चमको कार्यकर्ते”, भावी, आजी-माजी नगरसेवक, काही संघटना, पक्ष यांचे भले मोठे फ्लेक्स लावून शिवतीर्थ परिसर झाकोळून टाकला जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने नो फ्लेक्स झोनचा ठराव कायमचा रद्द करून शिवतीर्थ परिसरात लावलेला सूचना फलक तात्काळ काढावा किंवा धमक दाखवून कारवाई करून दाखवावी. दि. १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ठोस कारवाई न झाल्यास शिवजयंती दिवशी (दि. १९ फेब्रुवारी) शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शसुशांत मोरे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पुणे विभागीय आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी आणि सातारा शहर पोलीस निरीक्षकांना पाठवल्या आहेत.