सातारा प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची मुदत संपत असून या सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होत असते. मात्र, अद्यापही ही नियुक्ती झालेली नाही. याच कारणास्तव सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निकषानुसार राज्यपालांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन नवीन सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी. ही नियुक्ती न केल्यास उच्च न्यायालयात फेरजनहित याचिका दाखल करत राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सुशांत मोरे यांनी दिलेली माहिती अशी कि, मी नुकतेच राज्यपालांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. विधान परिषद सभागृह हे विचारवंतांचे मानले जाते. या सभागृहात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जातो. साहित्यिक ,पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबधित व्यक्ती या सभागृहात असल्या पाहिजेत हे निकष आहेत. सध्या विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपत असून लवकरच या जागी नवीन सदस्यांची आपल्याकडून केली जाणार आहेत. मात्र, अद्यापही ही सदस्य निवड प्रक्रिया झालेली नाही.
मुदत संपलेल्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत प्रचलित निकष न पाळल्याने मी उच्च न्यायालयात जनहित याचिका (Wpst/17405/2014) दाखल केली आहे. तिची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यावेळेस राजकीय पक्षांनी शिफारस केलेले सदस्य प्रचलित निकषात बसत असतील तरच त्यांची नियुक्ती करण्यात यावी. जर निकषाप्रमाणे नियुक्ती झाली नाही तर मला पुन्हा फेर जनहित याचिका दाखल करावी लागेल. तसेच राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मोरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे.