सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील पुनर्वसित गावची संपूर्ण जमीन खरेदी करणाऱ्या अहमदाबादच्या मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींच्या अडचणी वाढल्या आहेत. जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी जीएसटी आयुक्तासह नातेवाईक आणि शासकीय अधिकारी, उदयोगपतींच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.
सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावातील संपूर्ण ६४० एकर जमीनीच्या खरेदीचे खळबळजनक प्रकरण माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांतून उघड झाले आहे. अहमदाबादचे मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही जमीन खरेदी केली असून अनधिकृत रिसॉर्टचे बांधकामही सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अहवाल मागवला आहे.
सातारा जिल्हा प्रशासन या व्यवहाराची चौकशी करत असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडेही तक्रार केली आहे. त्यात चंद्रकांत वळवी यांनी आदित्य वळवी, अरमान वळवी, अनिल वसावे, दीपेश वसावे, रत्नप्रभा वसावे, अरूण वसावे, प्रफुल्ल चंदन, ओमप्रकाश बजाज, दीपाली मुक्कावार, अरुणा बोंडाळ, राधा खाबंदकोन, गौतम खांबदकोन, पियुष बोंगीरवार इत्यादी नातेवाईक आणि अधिकारी मित्रांच्या नावे झाडाणी गावची ६२० ते ७०० एकर जागा खरेदी केली आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
याप्रकरणात स्वतः चंद्रकांत वळवी तसेच त्यांच्या कुटूंबातील अन्य दोन आयएएस अधिकारी, महसूल खात्यातील सचिव, उपसिचवांची सखोल चौकशी करण्यात यावी. उचाट गावात चंद्रकांत वळवी यांनी वन आणि शासकीय जमिनीलगतचे क्षेत्र खरेदी केले आहे. त्यालगतची वन विभाग आणि शासनाची कित्येक हेक्टर जागाही लुबाडण्याचा त्यांचा डाव असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे वन विभाग आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे. वळवी यांनी रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केले असून त्यासाठी वन क्षेत्रातून वीज पुरवठा नेण्यात आलाय. कोणाच्या आदेशाने वीज पुरवठा करण्यात आलाय, याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चंद्रकांत वळवी आणि त्यांचे नातेवाईकांची उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता आहे. सातारा, नंदूरबार आणि गुजरात तसेच इतर जिल्ह्यांसह राज्याबाहेर असणाऱ्या स्थावर, जंगम मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी सुशांत मोरे यांनी अँटी करप्शन विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे. अर्जाच्या प्रती पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनाही देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी माध्यमांना सांगितलं आहे.