सातारा प्रतिनिधी । खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या लता अशोक फरांदे यांनी निवडणुक अर्ज माहिती भरताना खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल करत कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे पती यांच्या नावाने असलेल्या अशोक फरांदे यांच्या मिळकतीमधील मोबाईल टॉवरचा ग्रामपंचायतीचा कर थकित असतानाही प्रतिज्ञापत्रात कोणतेही थकबाकी नसल्याचे लता फरांदे यांनी नमूद केले आहे, त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमनाचे उल्लंघन केले असून त्यांना अपात्र करण्यात यावी अशी याचिका सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या याचिकेत सरपंच लता फरांदे, खेड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यात लता फरांदे या ग्रामपंचायत खेड ता. जि. सातारा येथील रहिवासी असून श्री. अशोक शिवाजी फरांदे रा. खेड ता. जि. सातारा यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या नावे ग्रामपंचायत मिळकत नं. १६९७ हि मिळकत आहे. दोघे एकत्रित वास्तव्यास आहेत. लता फरांदे यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये खेडमधील सरपंच पदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक लढवली असून त्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत.
अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या नियमानुसार देय असलेली कोणत्याही रक्कमेची थकबाकी शिल्लक ठेवलेली नाही असे त्यांच्या सहीने दिले आहे. परंतु ग्रामपंचायत खेड ता. जि. सातारा चे ग्रामविकास अधिकारी यांनी जावक क्र. ५७९/२०२२-२०२३ ने दि. 30 ऑगेस्ट २०२२ रोजी दिलेल्या दाखल्यामध्ये ग्रामपंचायत मिळकत नं. १६९७ हे सा.वाली यांचे पती अशोक शिवाजी फरांदे यांच्या नावे असून या मिळकती मध्ये मोबाईल टॉवर असल्याचा व ते व्हिजन टॉवर प्रा. लि. हि मोबाईल कंपनी असून भाडे कराराने दिलेला आहे. या मिळकतीचे २०२२-२०२३ अखेरचा ग्रामपंचायत कर येणे बाकी आहे असा दाखला दि. ३०.०८.२०२२ रोजी दिला आहे.
त्यावरून लता फरांदे यांनी निवडणूक अर्ज घोषणापत्रात ग्रामपंचायत कर थकबाकी नाही असे खोटे व चुकीचे नमुद केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ह) प्रमाणे अपात्र होण्यास पात्र झालेल्या आहेत. तरी तरतुदीचा विचार करता सदस्या लता फरांदे यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी श्री. मोरे यांचे वकील ॲड चंद्रकांत बेबले यांनी केली आहे. चौकशीवेळी अन्य कागदोपत्री, लेखी तोंडी पुरावा दाखल करु तसेच त्यांना अपात्र करण्यात येऊन न्याय द्यावा, अशी मागणीही मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.