जिल्ह्यात 6 हजार प्रगणकांद्वारे मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात मराठा समाज व इतर खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे 6 हजार प्रगणकांची नेमण्यात आली आहे.

जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणावेळी एकूण 182 प्रश्न विचारले जाणार आहेत. दि. 31 रोजीपर्यंत सर्वेक्षणाचे कामकाज चालणार असून सर्व्हेतील माहितीची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन असून, ते वापरण्याचे प्रशिक्षण आयोगामार्फत देण्यात आले होते. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे नोडल अफिसर आहेत. एक उपजिल्हाधिकारी हे सहायक नोडल ऑफिसर आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल ऑफिसर तर नायब तहसीलदार हे सहायक नोडल ऑफिसर आहेत. हे दोघेही शहरी तसेच ग्रामीण भागासाठी काम पाहणार आहेत. सर्वेक्षणासाठी आवश्यकतेनुसार तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगवाडी शिक्षिका व इतर शासकीय 7 हजार प्रगणक-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा समाजाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 22 नोडल अधिकारी, 26 प्रशिक्षक, 408 पर्यवेक्षक, 5 हजार 850 प्रगणक असे सर्व मिळून 6 हजार 306 कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. फलटण आणि कराड तालुक्यात कर्मचार्‍यांची सर्वाधिक संख्या आहे. या तालुक्यात अनुक्रमे 938 आणि 1 हजार 88 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत.