कराड प्रतिनिधी । आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलें सारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कराड तालुक्यातील कार्वे येथे डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७.४० कोटींच्या विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, माजी संचालक संपतराव थोरात, माजी उपसरपंच वैभव थोरात, संभाजी थोरात, माजी पं. स. सदस्य कैलास जाधव यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, आज कृष्णा समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांना आरोग्य, शिक्षण अशा सुविधा प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक पातळीवर हे काम सुरु असतानाच; डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून आणि भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून विविध गावांमध्ये विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. येत्या काळात सरकारच्या मदतीने कराड दक्षिणचा चौफेर विकास करण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना येत्या निवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी.