सातारा प्रतिनिधी । राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीत तीन दिवस मुक्काम ठोकला. त्यानंतर शनिवारी रात्री त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेट झाली. शाह यांच्यासोबत भेटीमध्ये दोघांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली. मात्र, यासाठी खा. उदयनराजेंना दिल्लीत तीन दिवस थांबावे लागले. या घडामोडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपने उदयनराजे भोसले यांना ताटकळत ठेवून साताऱ्याच्या गादीचा केलेला अपमान दुर्देवी आहे”, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी व उदयनराजे भोसले यांनी 10 वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांना मिळालेल्या या वागणुकीच्या आम्हाला वेदना आहेत. भाजप फक्त छत्रपतींचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान व द्वेष करण्याची एकही संधी सोडत नाही.
दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे नेते, खासदार उदयनराजे भोसले तीन दिवसांपासून दिल्लीत होते. शनिवारी रात्री त्यांची शहांशी भेट झाली. त्यानंतर राजेंचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याची चर्चा देखील केली जाऊ लागली आहे.
उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का?
उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा डाव टाकला. साताऱ्यातून उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का?’ असा प्रश्नही फडणवीसांनी आघाडीच्या नेत्यांना विचारला.