सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील विकास सेवा सोसायटीच्या रेशनिंग दुकानाची अनामत रक्कम जप्त करून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दुकानदाराच्या फेरचौकशीचे आदेश देखील जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांचा वतीने देण्यात आले. चोरडे येथील या दुकानाची पुरवठा निरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर वडूज तहसीलदारांकडून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अश की चोराडे येथील विकास सेवा सोसायटीच्या रेशनिंग दुकानातील गहू व तांदळाच्या अपहाराबाबतच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलल्या आदेशात रास्त भाव दुकानदाराने केलेला खुलासा अंशतः मान्य करण्यात येत असून रास्त भाव दुकानाची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करणेत येत आहे, असे नमूद केले आहे.
रास्त भाव दुकानात धान्य पोहोच झाले नसताना आगाऊ पावत्या ई-पॉस मशीनवर काढल्याबाबत १० हजार रुपये इतका दंड करण्यात आला आहे. भविष्यात अशी बाब निदर्शनास आल्यास अथवा तपासणीमधील दोषांची पुनरावृत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल, अशी सक्त ताकीद रास्त भाव दुकानदाराला देणया आली आहे. खटावच्या पुरवठा निरीक्षकांच्या तपासणी दिनांकादिवशी ऑनलाइनप्रमाणे असणारा धान्यसाठा, पंचनाम्यानुसार आढळून आलेला शिल्लक धान्यसाठा यातील विसंगतीबाबत रास्त भाव दुकानाची फेर तपासणी करावी व अहवाल सादर करावा, असा आदेश तहसीलदारांना देण्यात आला आहे.