सातारा प्रतिनिधी | वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई होणार का, या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध आणि तितकीच हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘असं कही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही’, असं आयजी फुलारींनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
भाजपा आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तेढ वाढवत आहेत. वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, म्हणून नोटीस द्यायला गेलेल्या इस्लामपूरच्या पोलीस निरीक्षकाला एकेरी भाषा वापरली. याप्रकरणी आ. नितेश राणेंवर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून पोलीस दलाची हतबलता स्पष्ट झाली. यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी थेट बोलणे टाळले. ‘जे काही घडलं, त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती केली जाईल किंवा केली देखील असेल, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
इस्लामपूर (ता. वाळवा) येथे २४ ऑगस्ट रोजी आ. राणेंनी पोलीस निरीक्षक हारूगडे यांना एकेरी भाषा वापरली. प्रक्षोभक भाषण करून जातीय तेढ निर्माण करू नये, म्हणून पोलीस निरीक्षक हारूगडे हे आ. राणेंना नोटीस देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘तू कोणाला नोटीस देतोयस, त्या मुस्लिमांना नोटीस दे. मी नोटीस घेत नाही. तिकडे फेकून दे’, अशी एकेरी भाषा आ. राणेंनी पोलीस निरीक्षकाला वापरली होती. त्यासंदर्भातील प्रश्नावर आयजी फुलारी म्हणाले, मी त्याबद्दल ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलू शकतो, परंतु, मीडियासमोर काहीही बोलणार नाही.