सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह जिल्ह्यात मुली-महिलांबाबतच्या ज्या तक्रारी आहेत, त्याला प्राधान्य देऊन तत्काळ कारवाई करा . तसेच जातीय तणावाबाबत सतर्क राहून खबरदारी घ्या, अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांना केल्या.
आयजी सुनील फुलारी यांनी पोलिस दलाचा नुकताच आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. आयजी सुनील फुलारी म्हणाले, बदलापूर घटनेच्या दक्षता घेऊन उपाययोजना कराव्या. मुली व महिला यांचे बाबतीत घडणार्या गुन्ह्याबाबत तत्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करावा. गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी. अटक केलेल्या आरोपींवर कडक प्रतिबंधक कारवाई करावी. निर्भया पथकाने सतर्क राहून गस्तीदरम्यान महिलाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करावा. शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुले/मुली यांना मार्गदर्शन करावे. आक्षेपार्ह किंवा अनुचित घडणार्या घटनेवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना आयजी फुलारी यांनी केल्या.
फुलारी पुढे म्हणाले, गणेशोत्सव, ईद व इतर धार्मिक सण व उत्सवांच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष न करता योग्य ती दक्षता घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. पूर्वी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करावी. सणांच्या पार्श्वभूमीवर गावभेटी देणे, शांतता कमिटीच्या बैठका घेणे, गणेश मंडळाच्या बैठका घेणे. चांगले काम करणार्या गणेश मंडळींना प्रोत्साहनपर बक्षीस देणे. सोशल मीडियावर लक्ष ठेवावे. दंगा काबू योजना राबवणे, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च काढण्याच्या सूचनाही आयजी फुलारी यांनी केल्या.