सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील डी-मार्ट नजीक असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी सडलेल्या अवस्थेत एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. शंभू मंगलदास तांबोळी असे आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फलटण तालुक्यातील पिंपळवाडी गावचा संबंधित व्यक्ती रहिवाशी असून कर्जबाजारीपणामुळे तो तणावात होता. शिवाय मनोरुग्णही असल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंभू तांबोळी हा पुण्याला कामाला होता. त्याच्यावर कर्ज असल्याने तो सतत तणावात राहत होता. तो मनोरुग्णही असल्याने त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले होते. या कर्जबाजारीपणाला तो कंटाळला होता. त्यामुळे तो चार दिवसांपूर्वी सातारा शहरातील डी-मार्ट जवळील डोंगर खाणीत गेला. त्याने त्या खाणीत उडी मारली. खाणीत पडल्याने त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले होते. त्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
चार-पाच दिवसांनी या ठिकाणाहून दुर्गंधी व वास येऊ लागल्याने काही लोकांनी पाहिले. तेव्हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून असल्यानंतर लोकानी याची माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक तांबे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा सुरू केला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बोलवून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.