महाराणी येसूबाई स्फूर्ती स्थळासाठी साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्षाचे अजितदादांना साकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूण येथील जनसंवाद यात्रेदरम्यान भेट घेतली. यानंतर राजेशिर्के यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर येथील महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी लवकर निधी उपलब्ध करून द्या, अशा मागणीचे निवेदन देत साकडे घातले.

यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम, शृंगारपूरचे सरपंच विनोद भिकाजी पवार व अभिषेक ढसाळे इत्यादी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनात म्हंटले आहे की, कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्फत हा प्रस्ताव राज्याचे महसूल व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या टेबलावर पोहोचला आहे. या स्फूर्ती स्थळासाठी आपण लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा.

प्राप्त मागणीनुसार शृंगारपूर येथील सर्वे नंबर 142 येथील जागा ग्रामपंचायत मालकीची असून येथे सातबारा दप्तरी सरकारी गोठण अशी नोंद आहे. या जागेपैकी 40 बाय 30 इतकी जागा स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी आवश्यक आहे. स्मारकानंतरही या जागेची मालकी शृंगारपूर ग्रामपंचायतीकडे राहणार आहे. सध्या या ठिकाणी एक चौथरा बांधण्यात आला असून त्याला महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले असे नाव देण्यात आले आहे.

येथूनच जवळ ऐतिहासिक प्रचित गड असून शृंगारपूर आणि प्रचित गड हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी शृंगारपूर येथील नियोजित स्थळी मोठे स्फूर्ती स्थळ होणे आवश्यक असल्याची येथील ग्रामस्थांची भावना आहे. या संदर्भात आम्ही विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्फूर्ती स्थळासाठी वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राजेशिर्के यांनी केली आहे.