मुकादमाने पैसे नाकारले म्हणून ‘त्यांनी’ चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून केलं जेवण; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मध्य प्रदेशमधून सातारा जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांना मुकादमाने पैसे दिले नाहीत. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे गरीब 65 मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून स्वत:सह लहान मुलांच्या पोटात दोन घास घातले. ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेश येथून ऊस तोडणीसाठी 65 मजूर एका मुकादमाने आणले आहेत. खटाव तालुक्यात त्यांची ऊसतोड सुरू होती. यासाठी त्यांना दिवसाला काही रक्कम देण्याचे ठरले होते. काही दिवस काम केले. त्यांना थोडे पैसे दिले. पण, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. काम केल्यानंतर पैशाची मागणी केली असता ठेकेदाराने भांडण करुन मारहाण केली.

यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. याबाबत ऊसतोड मजूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तेथेही त्यांची पदरी निराशाच आली. त्यामुळे हे मजूर बायकाे-मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्याबाहेर मुक्कामी आले. त्यावेळी ‘रिपाइं’च्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर धुमाळ यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधितांची विचारपूस करुन मदत देऊ केली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाशीही चर्चा केली.

त्यानंतर याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याचे निश्चित झाले. दरम्यान, मध्यप्रदेशातील या ऊसतोड मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवली आहे. त्यांच्याबरोबर महिला तसेच लहान मुलेही आहेत. गुरुवारी दिवसभर ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच होते. येथेच त्यांनी रात्रीचाही आसरा घेतला.