खासदार सुधा मूर्तींनी घेतली खा. उदयनराजे यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट; चर्चेनंतर दिलं ‘हे’ महत्वाचं आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देवून खा. भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे , विशेषत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्द्यांचा उल्लेख केला, त्याबद्दल खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रतापगड प्राधिकरणचे सदस्य चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनित पाटील, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. मूर्ती म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले. जगाला हेवा वाटावा असे अनेक पराक्रम केले. लोकशाहीचा पाया रचला. त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे. मूर्ती दाम्पत्याच्या इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले.

यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात आय टी पार्क उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या बरोबर सुरू असलेल्या प्रयत्नांची कल्पना दिली. इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आय टी कंपनी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी केली. तसेच साताऱ्याला भेट देण्याचे आमंत्रण दिले. प्रकल्प उभारण्यात सकारात्मक प्रतिसाद देवून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. सुधा मूर्ती यांनी दिले.