सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा येत्या दि. २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी यात्रा नियोजनाच्या आढावा बैठकीत केल्या.
मांढरदेव येथील यात्रेनिमित्त तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी बांधकाम, पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन आदी सर्व विभागांतील अधिकारी, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे आदी उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, तसेच प्रशासन म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे सांगितले. यापुढील बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी सर्व माहिती, दिलेल्या कामाची जबाबदारी आणि नियोजन काय केले, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सुना दिल्या. यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या कामाची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी आपल्या यात्रेपूर्वीच्या तयारी कामांचा आढावा मांडला.