सातारा प्रतिनिधी | म्हसवड परिसरातील शेंबडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधार्यात दि.15 रोजी बुडालेल्या हणमंत मोहन शेंबडे याचा मृत्युदेह अखेर म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला, मुलाचा मृत्युदेह पाण्यातुन बाहेर काढलेला मुलाला समोर पाहुन त्याच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा पाहुन उपस्थितांचे डोळेही पानावले.
शेंबडे वस्ती येथील बंधार्यात बुडालेला हणमंत हा त्याच वस्तीवर आपल्या आई – वडीलांसोबत रहात होता, तो इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकत असुन तो व त्याची आई हे दोघेही मुक बधीर आहेत.
हणमंत हा मुकबधीर असल्यानेच त्याला सातारा येथील गतीमंदासाठी असलेल्या शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते,
सध्या शाळांना गौरी – गणपतीच्या सुट्टया असल्याने हणमंत हा गावी ( शेंबडे वस्ती ) येथे आला होता. दि.15 रोजी हणमंत व त्याची आई हे दोघेही बंधार्याच्या परिसरात असलेल्या त्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरु करण्यासाठी गेले होते, त्याठिकाणी नदीपात्रात खुप पाणी असल्याने सध्या या परिसरातील लोकं नदीच्या दोन्ही बाजुला बांधलेल्या रस्सीच्या साह्याने ये – जा करीत आहेत.
त्यामुळे नदीच्या पैलतिरावर असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरु करण्याकरीता आई ला नदीकिनारी बसवुन नदीवर बांधलेल्या रस्सीच्या साह्याने पैलतिरी निघाला होता तो नदीच्या मधोमध गेल्यावर त्याचा रस्सीवरील हात निसटला अन् तो नदीपात्रात पडला त्याला पोहता येत होते तरी ही अचानकपणे नदीपात्रात तो पडल्याने घाबरलेल्या हणमंतास पोहताही आले नाही,
त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेला, समोरील दृष्य पाहुन हडबडलेल्या त्याच्या आईला तीही मुकबधीर असल्याने त्याला वाचवा असेही बोलता येईना त्याही परिस्थितीत ती घराकडे धावत गेली अन् घरी असलेल्या पतीला तिने खुनेनेच घडला प्रकार कथन केला.
पती मोहन शेंबडे यांच्या घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी त्वरित बंधार्याच्या दिशेने आरडा- ओरडा करीतच धाव घेतल्याने त्यांचा आवाज ऐकुन परिसरातील लोक त्यांच्यासोबत बंधार्याच्या दिशेने धावले, घटनेचे गांभीर्य ओळखुन यातील काहीजणांनी याची खबर म्हसवड पोलीसांना व म्हसवड नगरपालिकेला कळवली.
सदर ची माहिती मिळताच म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सखाराम बिराजदार हे दोघेही आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, त्याठिकाणची स्थानिकांकडुन माहिती घेत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने बंधार्यात उतरुन बुडालेल्या हणमंताचा शोध घेण्यास सुरुवात केली.