सातारा प्रतिनिधी । फलटण येथे नवीन जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन आज माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप आ. जयकुमार गोरे यांनी महत्वाचे विधान केले. “आता लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची अधिकृत उमेदवारी ही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे. आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वचजण भाजपाच्या दिंडीत सामील होणार आहेत; त्यामुळे कुणीही कसलीही चिंता करू नये; असे आ. गोरे यांनी म्हटले.
फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचच्या उदघाटन प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, सातारा परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. जयकुमार गोरे म्हणाले की, गेल्या 30 वर्षापासून फलटण शहरासह तालुक्याचा जो विकास रखडला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आलेले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये होते. त्यांना सुद्धा फलटण येथे सर्वसामान्य नागरिकांना सोयी सुविधा देता आल्या नाहीत.
फलटण येथे सुरू करण्यात आलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे मी माण तालुक्यामध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होतो. परंतु खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मला सुद्धा गंडवत फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले आहे. परंतु यामध्ये मला कसलाही दुजाभाव वाटत नाही. कारण सर्व जनता ही एकच आहे. घाटावरचा घाटा खालचा अशी भूमिका कधीही आमच्याकडून घेतली जाणार नाही. आम्ही कधीही घाटा खालच्याना म्हणालो नाही की तुम्ही एवढी वर्ष घाटावर कशाला येत आहात, असा टोला आ. गोरे यांनी यावेळी लगावला.
फलटण येथे मंजूर करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला MH 53 असा नंबर मंजूर आहे. परंतु सर्व फलटणकरांच्या इच्छेचा आदर ठेवत MH 55 ची मागणी आपण परिवहन खात्याकडे केलेली आहे. तोपर्यंत MH 11 च्या अंतर्गतच फलटण येथे सर्व कामकाज चालणार आहे; असेही यावेळी खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सातारा परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.