सातारा प्रतिनिधी | सातारा रोजगार हमी योजनेतील चार कामे पूर्ण केल्याचा दाखला देण्यासाठी बिलाच्या दोन टक्क्याप्रमाणे ६८ हजार रूपये लाचेची मागणी करून ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियत्यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. जितेंद्र राजाराम खलिपे (रा. पेडगाव रोड, वडूज, ता. खटाव), असे लाचखोर अभियत्याचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदाराचा अर्थमुव्हर्स आणि डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे. आदर्श फर्मच्या वतीने तक्रारदाराने रोजगार हमी योजनेतून तीन रस्त्यांची आणि एका समूह, गाडूळ निर्मिती शेडचे काम केले होते. ही कामे पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या उपविभागीय अभियत्याने बिलाच्या दोन टक्क्याप्रमाणे ६८ हुजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती याप्रकरणी तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत उपविभागीय अभियत्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर मंगळवारी तक्रारदाराकडून ५० हुजार रूपयाची लाच स्वीकारताना अभियत्यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, विक्रम पवार, हवालदार गणेश ताटे, नीलेश चव्हाण, शंकर सावंत, नितीन गोगावले, प्रियाका जाधव, विक्रमसिंह कणसे, मारूती अडागळे यांनी ही कारवाई केली.