जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी याशनी नागराजनांना पाठवली 1465 टपाल पत्रे; शाळांना भेटी देण्याचे दिले निमंत्रण

0
1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना १ हजार ४६५ पोस्ट कार्ड पाठवून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये शाळेतील सोयीसुविधा, शैक्षणिक उपक्रमांची माहितीही दिली. तसेच शाळांना भेट देण्याविषयीही विनंतीही करण्यात आली. त्यामुळे नागराजन यांनीही मुलांचे कौतुक करत शाळांना भेटी देण्याचे आश्वासन दिले आहे.

२०२५ या नवीन वर्षाच्या स्वागतप्रसंगी सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंददायी आणि रचनात्मक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एकूण १ हजार ४६५ पोस्टकार्डस लिहून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्टकार्डस नुकतीच प्राप्त झाली आहेत.

या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डमध्ये शाळेतील विविध सोयी-सुविधांविषयी तसेच इमारतीच्या सुधारणा, शौचालय, परसबाग, शालेय उपक्रम. निबंध तसेच क्रीडा स्पर्धा, २०० मीटर धावण्याची शर्यत, प्रश्नमंजूषा, लेझीम पथक, मनोरे, क्षेत्रभेट, वाचनालय, यशवंत प्रयोगशाळा, संगणक व कोडिंग प्रशिक्षण, शालेय पोषण आहार, आवडते शिक्षक, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, इंग्रजी भाषा बोलण्याची आणि गणित विषयाची आवड, परसबागेतील भाज्या आणि त्यांचा वापर, बालसभा, बाल बाजार आदींविषयी माहिती दिली आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डमधूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शाळेस भेट देण्याचे निमंत्रण देत प्रकृतीची काळजी घेण्याचा संदेशही दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या या रचनात्मक उपक्रमामुळे अनोख्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा आणखी एक नवा पैलू समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्त्व आणि आदर्श नागरिकत्वाची भावना दृढ होण्यास मदत होणार आहे.