आई-बाबा, कृपया मतदान करा; मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी लिहिली पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी तडवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच कार्यक्रम झाला. यावेळी “आपली लोकशाही जगप्रसिद्ध आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी आई आणि बाबा, प्लीज मतदान करा”, असे आवाहन तडवळे, ता. फलटण येथील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे लिहून केले.

यावेळी ‘स्वीप’चे सहाय्यक अधिकारी सचिन जाधव, हेमंत धापटे व कर्मचारी उपस्थित होते. सचिन जाधव यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पत्रे लिहिली. भारताची लोकशाही महत्त्वाची आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने आम्ही तुम्हाला मतदान करण्याची विनंती करत आहोत, असे या पत्रांमध्ये चिमुकल्यांनी नमूद केले आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदान आणि लोकशाहीचा अर्थ समजला. त्याचबरोबर पत्रलेखनाचा उपक्रम त्यांनी प्रथमच अनुभवला. पोस्ट कार्डवर पत्र लिहिणे, हे विद्यार्थ्यांसाठी नवीन होते. त्यामुळे पत्रे लिहिताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. शिक्षक गेजगे यांनी ‘स्वीप’ पथकाचे आभार मानले.