पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक; शिरवळमधील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात संप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यभरातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेलेले आहेत. महाविद्यालयीन शिक्षण, तसेच विद्यालयांना जोडलेल्या पशुचिकित्सालयांवरही बहिष्कार विद्यार्थ्यांद्वारे टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय एरवी गजबजलेले असलेल्या या महाविद्यालयासमोर शुकशुकाट पसरला आहे.

यासर्व महाविद्यालयातील चार हजार विद्यार्थ्यांनी १ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. राज्य सरकार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत असल्याने भविष्यात बेरोजगारांची नवी फौज सरकारला उभी करायची आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारण्यात आला. या आंदोलनामुळे सर्व ठिकाणी पशुचिकित्सालयांची सेवा ठप्प झाली आहे. या संपामुळे उपचारासाठीचा फटका अनेक जणांना बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नसताना महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाची खरेच गरज आहे का? हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. पाच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय व तीन नियोजित शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे असतानाही नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करता खासगी महाविद्यालयांना परवानगी देण्याचा उद्देश काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला गेला आहे.