सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम त्यांना तातडीने परत मिळणार आहे. याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करून त्यांना भरलेली शुल्काची रक्कम परत करावी, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ स्तरावर करून त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन त्यांनाही दुष्काळी विद्यार्थ्यांची फी माफ करून रक्कम परत करण्याची विनंती केली होती.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषय समजून घेतल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून त्यांचे पैसे परत देण्याबाबत सूचना दिल्या. त्यांच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगावचा पूर्व भाग, शिराळ्याचा पश्चिम भाग तसेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काही तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ होईल. त्यांनी यापूर्वी भरलेली परीक्षा शुल्कची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.