सातारा प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. आण्णासाहेब कल्याणी शैक्षणिक संकुल विद्यालयामध्ये विधी सेवा शिबीर व आंतरराष्ट्रीय ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन या विषयावर कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर यांनी मुलांसाठी बाल-अनुकूल कायदेशीर सेवा मालसा योजना-२०२४ व आंतरराष्ट्रीय ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन नालसा योजना, २०२५ या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, यांनी सार्वजनिक उपयुक्तता सेवा आणि केंद्र / राज्य सरकारच्या योजना, अनाथ प्रमाणपत्र, बाल संगोपण तसेच बालकांच्या मदतीसाठी १०९८ या नंबरची माहिती दिली. बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. सुचित्रा काटकर यांनी बालकांचे हक्क व बाल न्याय कायदा २०१५ याविषयी मार्गदर्शन केले. अॅड. सुचिता पाटील यांनी शिक्षणाचा अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या समुपदेशक ज्योती जाधव, यांनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार, यांनी सहकार्य केले. तसेच राष्ट्रीय कायदेशीर मदत हेल्पलाईन नंबर १५१०० विषयी माहिती दिली.