सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागातील महत्वाचा विभाग असलेल्या ‘सार्वजनिक बांधका’कडून सातारा जिल्ह्यातील राज्य मार्ग व जिल्हा मार्गावरील विविध पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जात आहे. नुकतेच विभागाकडून तीन मोठ्या पुलांची तपासणी करत तातडीने दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कराड तालुक्यातील कोयना जुना पूल, रेठरे येथील पूल तसेच ढेबेवाडीजवळील नाडे पूल या तिन्ही पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. आता उर्वरित मध्यम व लहान पुलांच्या तपासणीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांची तातडीने दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे.
महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गाला जोडणाऱ्या इतर सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आता या रस्त्यांवरील पुलांची क्षमता तपासणी व दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडून प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर केले जाते. यामध्ये पुलांमध्ये काही किरकोळ किंवा मोठी दुरुस्ती असेल, तर ती तातडीने केली जाते. पावसाळ्यापूर्वी केलेल्या तपासणीत तीन मोठ्या पुलांमध्ये दुरुस्ती करण्याचा अहवाल आला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली आहे. यामध्ये कराडचा कोयना जुना पूल, रेठरे पूल हा कमकुवत झाला होता.
त्याचे काम चांगल्या प्रकारे केल्याने त्याची आणखी २० वर्षे क्षमता वाढली आहे, तसेच नाडे- ढेबेवाडी रस्त्यावरील नाडे पूलही धोकादायक बनला होता. त्याचीही तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरेगाव रस्त्यावरील संगममाहुलीजवळील पुलाला शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाला आहे. त्याची दुरुस्ती, देखभाल त्यांच्या माध्यमातून होत आहे.
जिल्ह्यात मोठे पूल 4, मध्यम 41 तर लहान 29 पूल
सातारा जिल्ह्यात मोठे पूल चार, मध्यम ४१ तर लहान २९ पूल आहेत. या पुलांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासणी केली जाते. सध्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती होणार आहे. यापूर्वी तीन मोठ्या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.