सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात व जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या ६ पथकांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवार नाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, वनवासवाडी एमआयडीसी या ठिकाणी छापा टाकला. तसेच तेथून 2 देशी बनावटीची पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे, 3 कोयता असा 1 लाख 84 हजारांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करत 4 जणांसह 2 तडीपार आरोपींना अटक करत दमदार कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी दि. 7 जुलै रोजी ते दि. 8 जुलै रोजीचे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात ठिकठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मधुकर गुरव, मदन फाळके यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील 40 पोलीस अंमलदारांची स्वतंत्र 6 पथके तयार केली.
या पथकाने शुक्रवार, दि. 7 जुलै 2023 रोजीपासून ते आज दि. 8 जुलै रोजीपर्यंत आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवारनाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, वनवासवाडी एम.आय.डी.सी या ठिकाणी कोंबींग ऑपरेशन ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे प्रभावी कारवाई केली. यामध्ये दि. 7 रोजी सातारा शहरातील मोळाचा ओढा ते महानुभव मठ जाणारे रोडवर रुद्राक्ष टॉवर्स इमारतीचे समोर इसम स्वप्नील पोपट जाधव (वय 32, व्यवसाय शेती, रा. सराफवाडी ता. इंदापूर जि. पुणे) यांच्याकडे 65 हजार 600 रुपये किमतीचे 1 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला.
त्यानंतर दुसऱ्या पथकाने अजंठा चौक सातारा येथील हायवे रोडचे पुलाखाली थांबलेल्या शशिकांत सुभाष साळूंखे (रा. तांदुळवाडी, ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्याकडून 1 हजार 15 हजार 400 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, 1 दुचाकी असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याचे विरुध्द सातारा शहर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार अधिनियम कलम 2 (1), 25 अन्वये कारवाई केली आहे. त्यानंतर दि. आज सुपारी 1:40 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील चंदननगर येथे निकेत वसंत पाटणकर (वय 28, रा. अंगणवाडी शेजारी चंदननगर सातारा) याच्याकडून 500 रुपये किमतीचा लोखंडी कोयता ताब्यात घेत त्यास अटक केली.
तसेच तिसऱ्या पथकाने 1:15 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील आयटीआय समोर सुदर्शन राजू गायकवाड (वय 29, रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा) व संदिप पप्पू शेख (वय १९, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याचेकडून २ हजार ५०० रुपये किमतीची तलवार ताब्यात घेतली. तर शहरातील अंजली कॉलनी शाहुपूरी येथील प्रज्वल प्रविण गायकवाड (वय २४, रा. अंजली कॉलनी शाहुपूरी सातारा) व विकास मुरलीधर मुळे (वय २२, रा.पॉवरहाऊस झोपडपट्टी मंगळवारपेठ) या दोघांवर हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
2 तडीपार आरोपींना घेतले ताब्यात
याचबरोबर रहिमतपूर पोलीस ठाण्यातील आरोपी विक्रम कुमारसिंह चव्हाण (वय ४१, रा. २३ दुर्गापेठ सातारा) व शाहुपूरी पोलीस ठाण्याचा आरोपी दत्तात्रय उत्तम घाडगे (रा. दौलतनगर, सातारा) या दोघांना ताब्यात घेत रहिमतपूर व शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.