सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे. या परिसरामध्ये ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी ४३ कॅमेरे मतदान यंत्रे ठेवलेल्या खोल्यांवर, तर उर्वरित १८ कॅमेरे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून महसूल विभागाच्या कर्मचार्यांद्वारे मतमोजणी प्रक्रियेनिमित्त रंगीत तालीम चालू आहे. मतमोजणी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मतमोजणी परिसरामध्ये ३३१ पोलीस कर्मचार्यांसह ५७ नायब तहसीलदार मतदान यंत्रांवर लक्ष ठेवून आहेत. हा खडा पहारा २४ तास चालू आहे.
मतदान यंत्रे ठेवलेल्या खोल्यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दलाच्या २ स्वतंत्र तुकड्या आणि केंद्रीय पोलीस दलाची १ स्वतंत्र तुकडी, असा तिहेरी बंदोबस्त आळीपाळीने ठेवण्यात आला आहे. सध्या २ पोलीस निरीक्षक, २ साहाय्यक पोलीस निरीक्षक, २० पोलीस अंमलदार, तसेच राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ५० सैनिक पहारा देत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या दिवशी पोलिसांची कुमक वाढवण्यात येणार आहे. या दिवशी अनुमाने ३० पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेच्या ३० पोलीस कर्मचार्यांसह ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी मतमोजणी केंद्रावर बंदोबस्त पार पाडतील. या वेळी लाठी हातात असणारे पोलीसदल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सातारा पोलीसदलाने कळवले आहे.