सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील गुरुवार परज येथील बिर्याणी हाउसची तोडफोड, तसेच दगड फेकत दोघांना जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अमोल चंदू खवळे, अजय नथू गायकवाड (रा. नामदेववाडी झोपडपट्टी), सूरज कांता दाडे (रा. मोळाचा ओढा), ओमकार राजेंद्र पवार (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यासह सहा अनोळखींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार मुक्तार शेरअली पालकर (रा. शनिवार पेठ) यांनी तक्रार नोंदवली आहे.
मुक्तार पालकर यांचे गुरुवार परज येथे बिर्याणी हाउस आहे. शुक्रवारी रात्री त्याठिकाणी अमोल खवळे हा साथीदारांसमवेत आला होता. त्यांनी त्याठिकाणाहून चिकन ६५ खरेदी करत त्याचे पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद झाल्यानंतर अमोल खवळे व त्याच्या साथीदारांनी मुक्तार, तसेच त्यांचा पुतण्या अबरार यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. मारहाण करतच हल्लेखोरांना मुक्तार यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. यानंतर त्यांनी दगड फेकून मारला. यात अबरार पालकर, साबीर आदम शेख (रा. गुरुवार परज) हे जखमी झाल्याचे मुक्तार पालकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी त्याठिकाणाहून दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. याचदरम्यान दगडफेक विशिष्ट हेतूने झाल्याची अफवा साताऱ्यात पसरली व त्यामुळे तणाव निर्माण झाला. या तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पोलिसांनी राबवल्या.