कराड प्रतिनिधी । मोठ्या उत्साहात दुर्गादेवींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, दुर्गा उत्सव मिरवणुकीत डान्स करण्याच्या कारणावरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री जोरदार राडा झाल्याची घटना घडली. यात दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. यात एका जिप्सीचे नुकसान झाले असून शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही मंडळांतील २५ हून अधिक जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुर्गा उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत घडलेल्या घटनेप्रकरणी रोहित मोहन कदम (रा. समर्थनगर, मलकापूर) आणि आशिष अरुण भोसले (रा. महात्मा फुलेनगर, बुधवार पेठ, कराड) यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. रोहित कदम याने दिलेल्या तक्रारीवरून अमित उत्तम कांबळे, आशिष अरुण भोसले, ओंकार प्रल्हाद कांबळे, अभिजित हणमंत बल्लाळ, रोहित रमेश कारंडे, तुषार सुभाष थोरवडे, योगेश भोसले, सोनू पाटोळे, अथर्व साठे, प्रेम भोसले या दहा जणांसह अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आशिष भोसले याच्या फिर्यादीवरून रोहित मोहन कदम, यश पोपटराव सकट, साहिल लियाकत मुल्ला, गोविंद ईराप्पा पवार, ओंकार सोमनाथ हुबळीकर, सचिन लांडगे यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्यापासून शहरात वेगवेगळ्या मंडळांच्या दुर्गा देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. सोमवारी सायंकाळनंतर सुमारे ३५ हून अधिक मंडळाच्या दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होणार होते. शहराच्या मुख्य बाजारपेठेत मंडळाची रांग लागली होती. त्यात लहान मोठ्या अनेक मंडळांचा समावेश होता. आझाद चौकात बेफाम नृत्य झाल्यानंतर मंडळे पुढे सरकत होती.
रात्री दहापर्यंतच स्पीकरच्या आवाजाची परवानगी होती. त्यामुळे मंडळे लवकर बाहेर पडली होती. त्यात मलकापूर भागातील काही मंडळे होती. शहरातील बुधवार पेठेतील काही गुंडांशी वाद असलेल्या मंडळाचाही त्यात समावेश होता. मलकापूरच्या मंडळाच्या मागेच बुधवार पेठेतील मंडळ होते. त्या मंडळांमध्ये नाच गाण्यावरून मोठी स्पर्धा सुरू होती. दोन्ही मंडळे सायंकाळी सातच्या सुमारास मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला लागली होती. दत्त चौकापासून त्यांच्यात अक्षरशः स्पर्धा सुरू होती. त्यावर पोलिसांचीही करडी नजर होती.
दोन्ही मंडळाकडून जोरादार शक्ती प्रदर्शन होत असतानाच रात्री दहा वाजता स्पीकर बंद झाले. त्यानंतर मिरवणुका शांतेतेत जातील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे तेथून पोलिसांचा बंदोबस्त काही प्रमाणात सैल झाला होता. नेमक्या त्याचवेळी राडा झाला. येथील नेहरू चौकापासून जवळच दोन गटात जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. तसेच लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यात एका जिप्सी कारचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पोलिसांनी पहाटेपर्यंत दोन्ही मंडळांतील तब्बल २० जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक राम ताशीलदार, सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर, अमित बाबर यांनी आपल्या सहकाऱ्यांना मदतीला घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.