चोरीस गेलेल्या स्टील चोरीचा गुन्हा 3 तासांत उघड; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कालेटेक येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टीलची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. अखेर चोरट्यास अटक करण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सुमारे 3 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुखदेव सर्जेराव मोरे (मूळ रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. कालेटेक, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आदिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कालेटेक येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेले सुमारे 90 हजार रुपये किमतीचे दीड टन वजनाचे स्टील चोरीस गेले होते. याबाबतची तक्रार विकास जगन्नाथ पाटील यांनी शनिवारी कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.

तक्रार दाखल झाल्यानांतर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास दिल्या होत्या. त्यानंतर शनिवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांना संबंधित गुन्ह्यातील आरोपी पाचवड फाटा येथे येणार असल्याचे माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी पाचवड फाटा येथे सापळा लावला. तसेच वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान, सुखदेव मोरे हा चोरीचा माल विक्रीकरीता घेऊन जात असताना पोलिसांनी पाचवड फाटा येथे त्याचे वाहन अडवले. तसेच त्याची चौकशी करत तपासणी केली असता त्याच्याकडे चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 3 लाख 90 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांनी केली.