सातारा प्रतिनिधी | जाती-धर्माच्या नावावर कुटुंबातील मुला-मुलींचा जोडीदार निवडण्याचा हक्क डावलला जाण्याच्या घटना घडत असतात. मुला-मुलींनी स्वत:च्या मर्जीने जाती-धर्माच्या बाहेरचा जोडीदार निवडला तर त्यांची हत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जाते. या पार्श्वभूमीवर अंतरजातीय आणि अंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा देणारे महाराष्ट्रातील पहिले ‘सेफ हाऊस’ सातारा जिल्ह्यातील पिंपरी (ता. कोरेगाव) इथं सुरू करण्यात आलं असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोळकर आणि शंकर कणसे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
अंनिस देत आहे पाठबळ
आंतरजातीय आणि आंतर धर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. घरच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळं अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या सुरूवातीला गावी लगेच जाता येत नाही. तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून जीवाचा धोका उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते. खोट्या प्रतिष्ठेसाठी मुला-मुलींचा बळी घेतला जातो, अशा पंजाब, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये राज्य शासनाच्या मदतीने सेफ हाउस चालवली जातात. याच स्वरूपाचे पहिले सेफ हाउस सातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलं आहे.
स्वखर्चाने उभारला सुरक्षा निवारा
महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे यांनी स्वमालकीच्या जागेत स्वत: खर्च करून हा सुरक्षा निवारा उभारला आहे. महाराष्ट्र अनिस आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जाणार असल्याची माहिती डॉ. हमीद दाभोळकर यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात गृह विभागाने अंतर जातीय आणि आंतर धर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात निवारा केंद्र उभारण्याचे निर्देश
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे, असे देखील निर्देशित केलं आहे. या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र अंनिससारख्या सुरक्षा निवारा केंद्र चालवणाऱ्या संस्थांना मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास डॉ. हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केला आहे.
मदतीसाठी सुरू केला आधार गट
जात ही कुठलाही वैधानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे. या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या भूमिकेला अनुसरून हे केंद्र चालू केले असून आंतर जातीय विवाहांच्या माधमातून जाती निर्मुलनाचा प्रयत्न असल्याचे हमीद दाभोळकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अंनिस मार्फत आज अखेर लावण्यात आलेल्या अंतर जातीय आणि अंतर धर्मीय लग्नाच्या जोडप्यांमधील काही लोक याकमी अंनिसला मदत करणार आहेत. अशा जोडप्यांना होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मदत मिळावी म्हणून अंनिस मार्फत एक आधार गट देखील चालू करण्यात आला असल्याचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी सांगितले.
मोफत हेल्पलाईनवर करा संपर्क
आंतर जातीय आणि आंतर धर्मीय लग्न सहायता केंद्र चालवताना अंनिसमार्फत संबंधित मुला मुलींची मुलखात घेवून त्यांच्याशी संवाद साधला जातो. त्यानंतर पोलिसांची मदत घेवून त्यांचे लग्न लावण्यास मदत करणे आणि गरज पडल्यास त्यांना सुरक्षित निवारा पुरवणे हे काम केले जाते. हे सुरक्षा निवारा केंद्र पूर्ण मोफत चालवले जाते आणि आंतर जातीय, आंतर धर्मीय विवाह साह्यता केंद्राची मदत हवी असल्यास महाराष्ट्र अंनिस मार्फत ९९२२३५५४३५ ही मोफत हेल्पलाईनवर चालवली जाते, अशी माहिती डॉ. दाभोळकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.