मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी ‘रासप’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी कोट्यातून देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरक्षणाच्या विषयावरुन राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद निर्माण झालेला आहे. यामध्ये ओबीसी समाजाने व इतर ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. मात्र मनोज जरांगे पाटील वरिष्ठ नेत्यांना अरे तुरीची भाषा करून वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. सर्व समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नसताना महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित झाले आहे.

मनोज जरंगे यांनी आरक्षणाच्या बाबतीत गडबड करू नये. सरकार टिकणारे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजातील नेते व कार्यकर्ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून वातावरण दूषित करण्याचे काम करीत आहेत. याबाबत मराठा समाजाच्या नेत्यांनी लक्ष घालून बिघडत असलेले वातावरण शांत करावे. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे आमचा विरोध नाहीच. त्यांनाही न्याय देण्याची गरज आहे. मात्र हे करताना त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना तात्काळ व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.