कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून निधी वितरीत

0
389
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुंबई येथे झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या अशोकचक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा वनवास संपला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुकाराम ओंबळे यांचे त्याच्या जन्मगावी मौजे केडंबे येथे स्मारक बांधण्याचे काम प्रलंबित होते. या स्मारकाच्या बांधकामासाठी आता राज्य सरकारकडून 2 कोटी 70 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

अशोकचक्राने सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे त्यांच्या जन्मगावी मौजे केडंबे ता. जावळी जि. सातारा येथे स्मारक उभारण्यासाठी 13 कोटी 46 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 20 टक्के रक्कम अर्थात 2 कोटी 70 लाख रुपये इतका निधी पहिल्या टप्प्यात वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारने पत्रकद्वारे दिली आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या वेळी पराक्रमाची शर्थ करत दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्यावतीने तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात एक भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

२००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यावेळी अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णाल, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवला होता. दरम्यान, कामा रुग्णालयात हल्ला केल्यानंतर पुढे जात असलेल्या अजमल कसाब आणि त्याच्या एका सहकाऱ्यावा मुंबई पोलिसांनी वाटेत रोखले होते. त्याचवेळी कसाब याला जिवंत पकडत असताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. हा हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी केवळ अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्याला पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.