एसटीकडून 1 रुपयात 10 लाख रुपयांचे विमा कवच!; जखमींनाही तातडीने मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र शाळेतील शैक्षणिक सहली आणि लगीनघाई सुरू आहे. डिसेंबर महिना संपत आला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वातावरण आल्हाददायी असते. साहजिकच शाळांच्या सहली काढल्या जातात. पण अनेकदा सहलीच्या वाहनाला अपघात अशी बातमी कानावर येते अन् पालकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर १० लाखापर्यंत भरपाई मिळते.

राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही गेल्या सात दशकांहून अधिक वर्षांपासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. एसटीचे हे वेगळेपण जसे आहे, तसेच आणखी एक वेगळेपण पण एसटीने कधीही या पेशाकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य जोपासत असताना प्रवासी हिताला, प्रवासी सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे.

एसटीचे चालक-वाहक हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे एसटीला अपघात झाल्याच्या घटना फारच कमी आहेत. त्यातूनही एखादी दुर्घटना घडलीच तरी एसटीतील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या वारसांना तब्बल १० लाखांची नुकसान भरपाई दिली जाते.

तिकिटातील एक रुपयातून प्रवाशांचा विमा

एसटीतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक प्रवाशांकडून एका तिकिटामागे एक रुपया घेतला जातो. ही रक्कम कमी वाटत असली तरी दररोज प्रवास करणाऱ्या लाखो तिकिटातून मृत्युमुखी पडलेल्यालाही रक्कम दिली जाते.

जखमी प्रवासींनाही मदतीचा हात

अनेकदा एसटीच्या अपघातामुळे प्रवासी किवा बाहेरील व्यक्ती जखमी होण्याच्या घटना घडतात. अशावेळी एसटीकडून संबंधित जखमींवर उपचार केले जातात. त्यासाठी लागणारा खर्च दिला जातो. तसेच दवाखान्या जाण्यासाठी प्रवासात सवलतही दिली जाते.

कोणाला मिळते मदत?

एसटीतून प्रवास करणारे प्रवाशांचा मृत्यू झालेला असल्यास मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे वारसदार किंवा एसटीच्या धक्क्यामुळे रस्त्यावरील सायकलस्वार, पादचारी, बैलगाडी चालक, घोडेस्वार यांचा मृत्यू झालेला असल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसाला ही रक्कम दिली जाते.

सुरक्षित प्रवासाची एसटीकडून हमी

एसटी महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. त्याला कारणही तसेच आहे. एसटीच्या चालकांना सक्त सूचना असतात. त्यामुळे कोणत्याही पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास कधीही एसटी पाण्यात घातली जात नाही. जवळच्या बसस्थानकात नेऊन लावली जाते. एसटी चालक-वाहकांना आठ ते दहा तासांचीच ड्युटी लावली जाते. त्यामुळे कामाचा ताण ही बाब फारशी उरत नाही.