ST चालवत असताना हृदयविकाराचा आला धक्का, तरीही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । एसटी चालवत असताना अचानक चालकाला हृदयविकाराचा जोराचा धक्का बसला. मात्र, तरीही चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी दुभाजकावर चढवून जागीच थांबवली. त्यामुळे ३१ प्रवाशांचे प्राण बचावले. अखेर
उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक वारुंजी गावच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली.

राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे संबंधित एसटी चालकाचे नाव आहे. याबाबत वाहक फारुक कासीम शेख (रा. विटा) यांनी कराड शहर पोलिसात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विटा आगाराची विटा ते स्वारगेट ही एसटी घेऊन चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख हे दोघेजण कडेगावमार्गे कराडमध्ये आले. येथील बसस्थानकातून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीत ३१ प्रवासी होते.

एसटी महामार्गावर वारुंजी गावच्या हद्दीत आली असताना चालक बुधावले यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घालून तेथेच थांबवली. अचानक एसटी थांबल्यामुळे वाहक फारुक शेख हे केबिनजवळ गेले. त्यावेळी चालक बुधावले यांना प्रचंड घाम आला होता. तसेच चक्कर येत असल्याचे ते म्हणत होते. त्यामुळे वाहक शेख यांनी तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या एसटीत बसवले. तसेच चालक बुधावले यांना रिक्षातून साई रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना बुधावले यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.