सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हासेवाडी गावात आज एक धक्कादायक घटना घडली. राज्य परिवहन विभागाच्या धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतला. आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनहून भाडळे मार्गे कोरेगावकडे जात असताना एसटी महामंडळाच्या कोरेगाव डेपोच्या एसटीला अचानक आग लागली यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एसटी महामंडळाची कोरेगाव डेपोची गाडी क्रमांक (MH 11 B L 9337) ही दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशनहून भाडळे मार्गे कोरेगावकडे निघाली होती. या बसमध्ये एकूण 23 प्रवासी होते ज्यामध्ये 7 शालेय विद्यार्थी आणि 4 इतर प्रवासी प्रवास करीत होते. एसटी बस हासेवाडी गावात प्रवेश करत असताना एका महिला प्रवाशाला गाडीच्या इंजिन जवळून आगीच्या ज्वाला दिसून आल्या.
संबंधित महिलेने यांची माहिती तत्काळ बसमधील ईतर प्रवासी आणि चालक-वाहकास दिली. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर, सर्व प्रवासी तत्काळ बसमधून खाली उतरले. बसमधून प्रवासी खाली उतरताच काही मिनिटात बसने पेट घेतला. बसला आया लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या साह्याने बसला लागलेली आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.