सातारा प्रतिनिधी । अयोध्या येथील रामल्लांची प्राणप्रतिष्ठापनेनंतर दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील भाविकांना जाता यावे यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून सातारा ते अयोध्या ही थेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान. सोमवारी सताऱ्यातून 45 भाविकांना घेऊन पहिली सातारा ते अयोध्या अशी एसटी बस रवाना झाली. राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते आयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्र व्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजप पदाधिकारी आणि श्रीराम भक्तांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
अयोध्या येथे रामलल्लांच्या दर्शनासोबत शेगाव, काशी, प्रयागराज, अलाहाबाद ही एकाच प्रवासात पाच ठिकाणी साडेसात हजारांत देवदर्शन मिळणे शक्य होणार आहे. सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्य लोकांना अयोध्या आणि परिसरातील तीर्थक्षेत्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अभिनंदन केले. यावेळी प्रवास करणाऱ्या श्रीराम भक्तांना, चालक, वाहक आणि उपस्थितांना भाजपने पेढे वाटून आनंद व्यक्त करत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, शहर उपाध्यक्ष जयराम मोरे, विजय नायक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, पर्यावरण अभियानाचे जयदीप ठुसे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे तसेच आगर व्यवस्थापक शिंदे साहेब स्थानक प्रमुख शिंगाडे साहेब तसेच आगारातील कर्मचारी मंगेश शेलार, सुशिल साबळे, चालक अजित काटे, सौ. रोहिणी शिंदे, हर्षदा गवळी, रेहाना इनामदार, प्रकाश घोरपडे आणि इतर कर्मचारी आणि प्रवाशी उपस्थित होते.
6 हजार 500 रुपयांत पाच दिवसांचा प्रवास
सातारा ते अयोध्या ही बस शेगाव ते नागपूर मार्गे आयोध्या आणि परतीच्या प्रवासात वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन परत सातारा असा पाच दिवसांचा ४८ तासांचा प्रवास राहणार आहे. चार हजार किलोमीटर अंतर असलेल्या या प्रवासासाठी आरामदायी पुश बॅक सीट असलेल्या गाड्या उपलब्ध करण्यात आल्या असून प्रवासी भाडे प्रत्येकी 6 हजार 500 ठेवण्यात आले आहे. यामध्ये निवास आणि भोजनाचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही, एका गाडीमध्ये ४५ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवासी उपलब्ध झाली की लगेच बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मार्गाची केली पाहणी
सातारा ते अयोध्या अशी विशेष बससेवा सुरू करण्यापूर्वी सातारा आगारातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली. यात प्रवासादरम्यान कोणत्या टप्प्यासाठी किती वेळ, विश्रांतीच्या ठिकाणांची निश्चिती व अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतर बससेवेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.