साताऱ्यात फलाटावर ST बस लावत असताना चालकाचे सुटले नियंत्रण; कामगार गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फलाटावर एसटी बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटून एसटी बसने मिठाईच्या दुकानाला जोराची धडक दिली. यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी सातारा येथी बसस्थानकात घडली. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, खंडाळा आणि कराड येथे एसटीचे आणखी दोन अपघात झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव-कोल्हापूर एसटी (एमएच ०७सी ९२२३) आज शनिवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सातारा बसस्थानकात आली. बसस्थानकातील फलाट क्रमांक १४ वर चालक एसटी उभी करत असताना अचानक एसटीचा वेग वाढला. फलाटावर असलेल्या मिठाई दुकानावर एसटी जोरदार धडकली. यात दुकानातील कामगार देविदास सोनटाके (वय ३५, रा. लातूर) याच्या पायाला गंभीर जखम झाली. आणि दुकानातील मिठाई व इतर वस्तू खाली पडल्याने मिठाई दुकानदाराचे मोठे नुकसान झाले.

या अपघातानंतर मोठा आवाज होताच प्रवाशांची एकच धावपळ उडाली. काही प्रवासी फलाटावरील बाकड्यावर बसले होते. सुदैवाने मिठाईच्या दुकानाला उडवून एसटी आतमध्ये गेली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या अपघातानंतर जखमी दुकानातील कर्मचाऱ्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खंडाळा आणि कराड या भागातही शनिवारी सकाळी एसटीचे दोन अपघात झाले.