सातारा प्रतिनिधी । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2024) निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक पटकाविला असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.१९ टक्के इतके आहे.
आज सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागला असून 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती गोसावी यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत पार पडली होती. सातारा जिल्ह्यातील ३७ हजार २५५ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. यापैकी ३७ हजार १५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १८ हजार ६१८ मुले तर १७ हजार ४९० मुली असे एकूण ३६ हजार १०८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ९३.६३ टक्के इतके आहे. बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या. यंदा मुलांच्या उत्तीर्णतेचे ९६.२८ टक्के प्रमाण तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे.